नवी दिल्ली: भारताला आपली क्षमता वाढवण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त केले. देश आपल्या सांस्कृतिक ताकद आणि क्षमतांच्या जोरावर जगासाठी आशेचा किरण बनू शकतो, असंही मोहन भागवत यांनी सांगितले. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त संघप्रमुखांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ध्वजारोहण केले.
मोहन भागवत म्हणाले की, देशाने तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जावे आणि जगाचे नेतृत्व करावे. मात्र, देशविरोधी शक्तींना आपण पुढे जावे असे वाटत नाही. भारत जगाला जागृत करण्यास सक्षम आहे, परंतु काही शक्ती भारताची प्रगती रोखू इच्छितात. त्यांच्यापासून सावध राहून आपल्या राष्ट्रध्वजात दडलेल्या संदेशानुसार काम करून देश एकसंध ठेवला पाहिजे. जेणेकरून नकारात्मक शक्ती यशस्वी होऊ शकत नाही, असं मोहन भागवत म्हणाले.
राष्ट्रध्वजाबद्दल स्पष्टीकरण देताना मोहन भागवत म्हणाले की, ध्वजाच्या शीर्षस्थानी असलेला भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे, जो जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. पांढरा रंग कोणत्याही स्वार्थाशिवाय शुद्धतेने काम करण्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे जे बुद्धिमत्ता, विश्वास आणि निःस्वार्थ शक्ती प्राप्त करण्यास मदत करते.
जगाला जागृत करण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळाले-
मोहन भागवत म्हणाले की, भारत जगाला शहाणपण, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवू शकतो. समर्थ भारत संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संघप्रमुख म्हणाले की, आपण सूर्याची पूजा करतो, म्हणूनच आपल्याला भारत म्हटले जाते, ज्यामध्ये बहा म्हणजे प्रकाश. जगाला जागृत करण्यासाठीच भारताला स्वातंत्र्य मिळाले.