ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - चालत जाणार की गाडीने ? असा पर्याय दिला तर अनेकांचं उत्तर गाडी असेल यात काही वाद नाही. अंतर कमी असो वा जास्त अनेकजण चालण्याचा आळस करताना दिसतात. आणि आता तर भारतीय आळशी असल्याचं अधिकृतपणे सिद्ध झालं आहे. 46 देशांत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये आळशी देशांच्या यादीत भारतानेही आपली नोंद करुन घेतली आहे. भारत या यादीमध्ये 39व्या क्रमांकावर आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त 4297 पावलं चालतात.
आणखी वाचा
स्टॅटफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा सर्व्हे केला आहे. जगभरातील 46 देशांमधील सात लाख लोकांना या सर्व्हेत समाविष्ट करण्यात आलं होतं. सर्व्हेत सहभागी झालेल्यांची पावलं मोजण्यासाठी किंवा दिवसाला ते किती चालतात याची नोंद ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्टेप काऊंटर्स अॅप इन्स्टॉल करण्यात आलं होतं.
एका दैनिकात हा सर्व्हे छापण्यात आला आहे. सर्व्हेनुसार चीनमधील नागरिक सर्वात कमी आळशी आहेत. त्यामध्ये विशिष्ट करुन हाँगकाँगमधील लोक जास्तच उत्साही आहेत. येथे लोक दिवसाला किमान 6880 पावलं चालतात.
इंडोनेशिया सर्वात आळशी देश ठरला आहे. दिवसाला किमान 3513 पावलं चालणं आवश्यक असतात. मात्र येथील लोक त्याच्या अर्धी पावलंही चालत नाहीत. जगभरातील किमान आकडा 4961 पावलं इतका आहे. अमेरिकन नागरिक दिवसाला किमान 4774 पावलं चालतात. हाँगकाँग, चीन, युक्रेन आणि जपान यांनी यादीत वरील स्थान पटकावलं असून या देशांमधील नागरिक दिवसाला किमान सहा हजार पावलं चालतात. तर मलेशिया, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यादीमध्ये सर्वात खाली असून येथील नागरिक दिवसाला फक्त 3900 पावलं चालतात.
सर्व्हेतून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त चालतात. भारतीय महिला दिवसाला किमान 3684 पावलं चालतात, तर पुरुषांच्या बाबतीत ही संख्या 4608 आहे. महिला आणि पुरुष दोघांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे जास्तीत जास्त चालण्याने कमी लठ्ठपणा येतो. मात्र महिलांनी आपल्या चालणं बंद केल्यास किंवा कमी केल्यास लठ्ठपणा अतिवेगाने वाढतो. महिलांच्या बाबतीत याचं प्रमाण 232 टक्के आहे. तर पुरुषांच्या बाबतीत 67 टक्के आहे.