डोक्लामनंतर आता अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील आसफिला क्षेत्रात भारतीय सैन्य देत असलेल्या पहाऱ्याला चीनने आक्षेप घेतला आहे. भारतीय सैन्याकडून घातली जाणारी गस्त म्हणजे अतिक्रमण आहे, असे चीनने म्हटले आहे. मात्र भारताने चीनचा आक्षेप धुडकावून लावला आहे. 15 मार्चला भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत चीनने भारताकडून अरुणाचल प्रदेशातील आसफिला क्षेत्रात सुरु असलेल्या पेट्रोलिंगला आक्षेप घेतला. मात्र चीनचा हा आक्षेप भारताने खोडून काढला. आसफिला परिसर अरुणाचल प्रदेशच्या सुबानसिरी जिल्ह्यात येतो. भारतीय लष्कराकडून या भागात नियमित गस्त घातली जाते. या भागातील भारतीय सैन्याचा पहारा म्हणजे अतिक्रमण असल्याचे चिनी सैन्याने म्हटले होते. मात्र भारताने यावर आक्षेप घेतला, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 'आफसिला परिसरात दिल्या जाणाऱ्या पहाऱ्याचा चीनकडून होणारा विरोध अतिशय आश्चर्यजनक आहे,' असे एका भारतीय अधिकाऱ्याने म्हटले. या भागात चीनकडून अनेकदा घुसखोरी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष सीमारेषेबद्दल भारत आणि चीनमध्ये वाद आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांग प्रदेशाच्या मोठ्या भूभागावर चीनने अनेकदा दावा सांगितला आहे. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत चीनने अतिशय आक्रमकपणे आसफिला क्षेत्रातील भारतीय लष्कराच्या गस्तीचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय लष्कराच्या अशा कृतीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढेल, असा सूचक इशाराही चीनकडून देण्यात आला. मात्र चीनचा हा आक्षेप भारतानेही आक्रमकपणे खोडून काढला. भारतीय लष्कर या भागातील गस्त कायम ठेवेल, अशा स्पष्ट शब्दांमध्ये चीनला भारतीय अधिकाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
आता अरुणाचल प्रदेशमध्ये तणाव?; भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंगला चीनचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2018 6:40 PM