ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25- चीन हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे असा समज होता. पण या आठवड्यात झालेल्या एका रिसर्चने चीनपेक्षा भारताची लोकसंख्या जास्त असल्याचा दावा केला आहे. चीन हा सर्वाधीक लोकसंख्येचा देश असल्याचा समज चुकीचा आहे, असं या रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रिसर्चनुसार भारत हा आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. विस्कॉन्सिन मॅडिसन युनिव्हर्सिटीचे रिसर्चर फुक्सियान यांनी चीनच्या पेकिंग युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात हा दावा केला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीनमध्ये 1991 ते 2016 या वर्षांमध्ये 377.6 दशलक्ष मुलांनी जन्म घेतला आहे. खरंतर 464.8 दशलक्ष हा अधिकृत जन्मदराचा आकडा आहे. पण रिसर्चनुसार ही माहिती अयोग्य असल्याचं सांगितलं जातं आहे. लोकसंख्येच्या अधिकृत माहितीनुसार चीनची आत्ताची लोकसंख्या 1.38 अब्ज आहे, पण ही माहिती अयोग्य असल्याचं रिसर्चर फुक्सियान यांचं म्हणणं आहे. खरंतर हा आकडा 90 दशलक्षपेक्षा कमी असायला हवा होता. रिसर्चरनुसार भारताची लोकसंख्या या पेक्षा खूप जास्त आहे.