भारतामध्ये 1950 ते 2015 या 65 वर्षांच्या कालावधीत बहुसंख्यक हिंदू समाजाच्या लोकसंख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कालावधीत देशाच्या लोकसंख्येतील हिंदू समाजाचा वाटा 6 टक्क्यांनी घटला आहे. याशिवाय, पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या इतर देशांसोबत तुलना करता, तेथे बहुसंख्यक मुस्लिम समाजाचा एकूण लोकसंख्येतील वाटा वेगाने वाढला आहे. या अभ्यासानुसार, एकिकडे भारतामध्ये हिंदू समाजाचा वाटा घटला आहे, तर अल्पसंख्यक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिख समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच, हिंदूंशिवाय, जैन आणि पारशी समाजाची लोकसंख्याही घटली आहे.
काय आहे अभ्यासात -अभ्यासानुसार, या कालावधीत एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा 5 टक्क्यांनी वाढला आहे, ख्रिश्चनांचा वाटा 5.38 टक्के आणि शीखांचा वाटा 6.58 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय बौद्धांचा वाटाही वाढला आहे. अहवालानुसार, 1950 मध्ये भारताच्या लोकसंख्येत हिंदूंचा वाटा 84 टक्के होता. आता तो 78 टक्क्यावर आला आहे. गेल्या ६५ वर्षांपूर्वी भारताच्या लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा 9.84 टक्के एवढा होता. तो आता 14.09 टक्के झाला आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या देशातील बहुसंख्य समाजाची लोकसंख्या कमी झाली, अशा शेजारील देशांमध्ये म्यानमारनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
या कालावधीत म्यानमारमध्ये बहुसंख्यक बौद्ध समुदायाच्या लोकसंख्येचा वाटा 10 टक्क्यांपर्यंत घटली आहे. तसेच नेपाळच्या लोकसंख्येतही बहुसंख्यक हिंदुंचा वाटा 3.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने आपल्या अहवालात एकूण 167 देशांचा अभ्यास केला आहे. भारतात स्थिरता दिसून आली आहे. भारतातील अल्पसंख्याकांना केवळ संरक्षणच मिळालेले नाही, तर त्यांची लोकसंख्याही झपाट्याने वाढत असल्याचे या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.