नवी दिल्ली - चीनच्या सीमेलगत 73 रस्त्यांची बांधणी करण्याचे काम भारताने याआधीच सुरू आहे. आता मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक चांगल्या दळणवळणासाठी भारताकडून अधिक उत्तम पर्याय शोधला जात आहे. त्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक बोगदे खोदण्याचा विचार भारताकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपली क्षमता वाढवण्याबरोबरच भारत तेथे 17 बोगदे खोदण्याच्या योजनेवर काम करत आहे. या मार्गावर बोगदे खोदल्याने रस्ते मार्गाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचण्याचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात डोकलामसारखी परिस्थिती उद्भवली तरी हिमवृष्टीमध्येही तेथे पोहोचणे लष्करासाठी सहजशक्य होणार आहे. सीमारेषेवर रस्ते बांधण्यासाठी जमिन अधिग्रहण करणे आणि फॉरेस्ट क्लिअरंस मिळण्यामध्ये खूप अडथळे येतात. मात्र बोगदे खोदण्यासाठी अशी अडचण येत नाही. या क्षेत्रामधीली आपली क्षमता आणि तांत्रिक गजरा विचारात घेऊन सीमारेषेवर बांधकाम करणाऱी भारताची प्रमुख एजंसी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने या आठवड्यात दोन दिवसांच्या एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात डीएमआरसी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रेल्वे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, लष्कर आणि असे काम करणाऱ्या परदेशी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत बोगदे खोदण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य ठरेल याबाबत चर्चा झाली. सीमारेषेवर रस्ते बांधण्यामधील आव्हाने -लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराच्या चौक्या आणि सर्वसामान्य जनतेचा वर्षातून सुमारे 6 महिने पाऊस आणि हिमवृष्टीमुळे रस्ते मार्गाशी असलेला संपर्क तुटतो. - अशा परिस्थितीमध्ये केवळ हवाई मार्गाच्या मदतीवर लष्कर आणि नागरिकांना विसंबून राहावे लागते. चीनने गेल्या महिन्यात डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली होती. भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे.
चीनच्या सीमेलगत बोगदे खोदण्याची भारताची तयारी, दळणवळण होणार सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 2:59 PM