नवी दिल्ली – भारतात ७ मे नंतर पहिल्यांदाच कोरोना व्हायरस(SARS COV 2) ची R वॅल्यू १ च्या पलीकडे गेली आहे. याबाबत माहिती इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स चेन्नईच्या स्टडीतून समोर आली आहे. R0 अथवा R हा असा फॅक्टर आहे जो कोरोना संक्रमित एक व्यक्तीपासून किती लोकांना संक्रमण पोहचवू शकतो याचा अंदाज देतो. देशात काही राज्यांना कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं समोर येत आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स कम्प्यूटेशनल विज्ञान आणि थियोरेटिकल फिजिक्सचे प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, २७ जुलैनंतर भारतात ‘R’ १ पार केले आहे. ७ मेनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे जेव्हा कोरोनाची दुसरी लाट जवळपास संपुष्टात आली होती. २७ ते ३१ जुलैमध्ये R वॅल्यू १.०३ इतकी होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही या भारतात R वॅल्यू १ च्या आसपास पोहचल्याची माहिती दिली आहे.
१ च्या खाली मूल्यांकन चांगले
महामारीच्या काळात आरोग्य प्राधिकरण वारंवार R मूल्यांकन १ च्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा व्हायरस पसरणं बंद होईल. कारण ही महामारी कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करू शकत नाही. R वॅल्यूचा अर्थ एक कोरोना संक्रमित व्यक्ती सरासरी कमीत कमी एक व्यक्ती संक्रमित करू शकतो. तर १ पेक्षा कमी वॅल्यूचा अर्थ कोरोना संक्रमित व्यक्ती एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतो.
‘या’ राज्यात R वॅल्यू चिंतेचा विषय
भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ४० हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा वगळता बहुतांश पूर्वोत्तर राज्यात R वॅल्यू १ पेक्षा अधिक आहे. विशेषत: केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश याठिकाणी वाढणाऱ्या सक्रीय रुग्णांमुळे डोकेदुखी वाढली आहे. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशात R वॅल्यू १ च्या आसपास आहे.
तिसऱ्या लाटेची संभावना असताना धोका वाढला?
भारतात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता R वॅल्यूमुळे धोका वाढला का यावर प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, R वॅल्यू १ पेक्षा जास्त असणं तात्पुरतं असावं आणि काही दिवसांनी पुन्हा R वॅल्यू १ पेक्षा खाली यावी. जर देशातील अनेक राज्यात एकाच वेळी R वॅल्यू १ पेक्षा अधिक झाल्यास सक्रीय रुग्णांच्या संख्येत भर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धोक्याचे संकेत आहेत असं त्यांनी सांगितले.