नवी दिल्ली: भूक आणि कुपोषणावर लक्ष्य ठेवणाऱ्या 'ग्लोबल हंगर इंडेक्स 2021' चा अहवाल समोर आला आहे. हा अहवालाने भारताची चिंता वाढवलीये. या यादीत भारत 101 व्या स्थानावर घसरला आहे, जो 2020 मध्ये 94 व्या स्थानावर होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ भारताच्या पुढे गेले आहेत. 116 देशांच्या यादीत भारताला 101 वे स्थान मिळाले, तर पाकिस्तान 92 व्या स्थानावर, नेपाळ आणि बांगलादेश 76 व्या स्थानावर आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्सच्या माहितीनुसार, चीन, ब्राझील आणि कुवैत यासह 18 देश पाचपेक्षा कमी जीएचआय गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स हे लोकांना वेगवेगळ्या देशांमध्ये अन्नपदार्थ कसे आणि किती मिळतात हे दाखवण्याचे माध्यम आहे. 'ग्लोबल हंगर इंडेक्स' हा निर्देशांक दरवर्षी ताज्या आकडेवारीसह जाहीर केला जातो.
काय आहे निर्देशांक?
या निर्देशांकाद्वारे उपासमारीविरुद्धच्या मोहिमेतील यश आणि अपयश जगभर दाखवले जाते. हा अहवाल आयर्लंडची मदत संस्था कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. भारतातील उपासमारीच्या पातळीबाबत या अहवालाने चिंता व्यक्त केली आहे. वर्ष 2020 मध्ये 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर होता. अहवालानुसार भारताचा GHI स्कोअर खाली आला आहे. वर्ष 2000 मध्ये ते 38.8 होते, जे 2012 ते 2021 दरम्यान 28.8-27.5 पर्यंत कमी झाला.
GHI स्कोअर कसा ठरवला जातो?
GHI स्कोअर कुपोषण, वजन, उंची आणि बालमृत्यू या चार संकेतकांच्या आधारावर ठरवला जातो. उच्च GHI म्हणजे त्या देशात उपासमारीची समस्या अधिक आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्या देशाचा स्कोअर कमी असेल तर याचा अर्थ असा की तेथील परिस्थिती अधिक चांगली आहे.