युक्रेन-रशिया युद्धात भारताची मध्यस्थी करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 05:40 AM2023-02-26T05:40:59+5:302023-02-26T05:41:20+5:30
पंतप्रधान मोदींनी जाहीर केली भूमिका, जर्मनीचे चान्सलर शोल्ज यांच्याशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धावर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज आहे. युद्ध थांबविण्यासाठी कोणत्याही शांतिप्रक्रियेत सहभागी होण्यास भारत तयार आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी शनिवारी स्वच्छ ऊर्जा, व्यवसाय, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञान यासह अनेक मुद्यांवर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा केली. त्यावेळी ही भूमिका त्यांनी जाहीर केली.दोन्ही नेत्यांच्या बैठकीत रशिया-युक्रेन संघर्ष, डिजिटल परिवर्तन, फिनटेक, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, पुरवठा साखळी आणि स्वच्छ ऊर्जा आदी विषयांवर विचारांचे आदान-प्रदान झाले. नंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
युक्रेन युद्धाचा जगावर परिणाम : माेदी
nमोदी यांनी सांगितले की, कोविड साथ आणि युक्रेन युद्ध याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. विशेषत: विकसनशील देशांवर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.
nयाबाबत आम्ही एकमेकांची चिंता जाणून घेतली. यावर एकत्रित प्रयत्न करूनच तोडगा काढला जाऊ शकतो, याबाबत आमची सहमती झाली आहे. जी-२० च्या अध्यक्षपदाची जबाबदारी निभावताना भारत या दिशेने प्रयत्न करीत आहे.
शोल्ज यांचा पहिलाच भारत दौरा
जर्मनीचे चान्सलर शोल्ज हे शनिवारी भारताच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आले. अंजेला मर्केल यांच्या १६ वर्षांच्या ऐतिहासिक कार्यकाळानंतर शोल्ज हे डिसेंबर २०२१ मध्ये जर्मनीचे चान्सलर बनले. त्यानंतर ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत.
हिंसेद्वारे देशाच्या सीमा बदलू शकत नाही : चान्सलर शोल्ज
जर्मन चान्सलर शोल्ज यांनी सांगितले की, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील देशांवर आक्रमक युद्धाचा परिणाम होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. युक्रेनमध्ये युद्धामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
पायाभूत सुविधा आणि वीज वितरण व्यवस्था नष्ट झाली आहे. हे एक संकट आहे. रशियाच्या आक्रमणामुळे संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. युद्ध हे मूलभूत सिद्धांतांचे उल्लंघन करते, यावर आम्ही सर्वजण सहमत आहोत. हिंसेच्या माध्यमातून तुम्ही देशांच्या सीमा बदलू शकत नाही.