नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढल्याचे बहुतांश भारतीयांनी मान्य केले आहे व सलग दुसऱ्यांदा मोदी सरकारला मिळालेल्या यशात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारतीय उद्योग महासंघ व अनंत सेंटरने आयोजित केलेल्या ‘द ग्रोथ नेट समिट ७.०’ या परिसंवादात ते बोलत होते. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात ते म्हणाले की, जागतिक संतुलन आकाराला येत असून, चीनची प्रगती तसेच काही मर्यादेपर्यंत भारताची प्रगती हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे, हे बहुतांश भारतीय लोकांनी मान्य केले आहे. सरकारने भारतात परिवर्तनाची शक्यता जिवंत ठेवण्याबरोबरच ती मजबूतही केली आहे, असेही ते म्हणाले.२०१५-२०१८ या कालावधीत विदेश सचिवपदावर काम केलेले जयशंकर यांनी म्हटले आहे की, सरकार देशांतर्गत तुलनेपेक्षा बाहेरून वेगळी दिसते. भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बाहेरील अर्थव्यवस्थांकडे सरकत आहे. भारतीय कंपन्या विदेशी बाजारपेठांपर्यंत योग्यरीत्या पोहोचण्यासाठी भारतीय विदेशी धोरणाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
सरकारी खात्यांमध्ये अधिक ताळमेळ राखण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे भारतीय कंपन्या विशेषत: विदेशी बाजारपेठांतील भारतीय कंपन्यांना ज्या आर्थिक मुद्यांवर संघर्ष करावा लागतो, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शेजारी देशांशी असलेल्या संबंधाचा विशेष उल्लेख करून जयशंकर म्हणाले की, सार्कऐवजी आता बिमस्टेकवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
सोशल मीडियाची मोहीम सुरूच ठेवूविदेशांमध्ये भारतीयांची मदत करण्यासाठी त्यांच्या पूर्वासुरी सुषमा स्वराज यांच्या सोशल मीडियाच्या मोहिमेला पुढे चालूच ठेवू, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. विदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाईल व आता सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचेल, अशी ते अपेक्षा करू शकतात. यामुळे विदेशी मंत्रालयाची प्रतिमाच बदलली आहे.