नवी दिल्ली - देशातली 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे असल्याचं अहवालातून उघडकीस झालं आहे. भारतातील तीन चतुर्थांश संपत्ती ही फक्त एक टक्के लोकांकडे एकवटल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. एकीकडे गेल्या वर्षी भारताला नवे 17 अब्जाधीश मिळाले असले तरी दुसरीकडे अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. त्यामुळे श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेत, तर गरीब आणखी गरिबीकडे ओढले जातायत. या दोन्ही वर्गातल्या दरीमुळे भारताचा आर्थिक समतोल बिघडला आहे.'ऑक्सफेम' या संस्थेच्या 'रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ' या अहवालातून हे स्पष्ट करण्यात आले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होऊ घातलेल्या विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 37 टक्के अब्जाधीशांना वारसाहक्काने संपत्ती लाभली आहे. अब्जाधीशांकडच्या एकूण संपत्तीपैकी 51 टक्के रक्कम 'या' (वारसाहक्काने अब्जाधीश झालेल्या 37 टक्के) श्रीमंतांकडे आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 73 टक्के संपत्ती ही फक्त 1 टक्के श्रीमंतांच्या भोवती केंद्रित आहे. तर दुसरीकडे लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या गरिबांची संपत्ती फक्त टक्क्यानं वाढली.महिला अब्जाधीशांची संख्या फक्त 4 टक्क्यांच्या घरात असून, त्यातील तिघींना वारसाहक्काने संपत्ती लाभली आहे. 2018 ते 2022 या कालावधीत देशात 70 लक्षाधीश होतील, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 101 अब्जाधीशांपैकी 51 जणांनी वयाची 65 वर्षं पूर्ण केली आहेत. त्यांच्याजवळ एकूण 10 हजार 544 अब्ज रुपये एवढी संपत्ती आहे. येत्या 20 वर्षांत ही रक्कम त्यांच्याकडे वारसांकडे गेल्यास त्यांना 30 टक्के दराने वारसा कर (inheritance tax) लावला जाईल. या माध्यमातून सरकारला 3 हजार 176 अब्ज रुपयांचा फायदा मिळेल. एवढी रक्कम आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी आणि स्वच्छता, नागरी विकास विभागांत खर्च करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
आर्थिक असमतोल ! देशातील 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 11:46 AM