नवी दिल्ली : भारताचा ‘क्लायमेट जस्टीस’च्या नेत्याच्या स्वरूपात उदय होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. २१ व्या शतकात भारताचे इथेनॉलला प्राधान राहील, असेही त्यांनी म्हटले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. ‘भारतात इथेनॉल मिश्रण : २०२०-२१ साठी पथदर्श’ या नावाच्या अहवालाचे विमोचन मोदी यांनी याप्रसंगी केले.अनेक राज्यांतील शेतकऱ्यांशी त्यांनी इथेनॉलच्या मुद्यावर बातचीत केली. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
ऊर्जा क्षमता वाढली- मोदी यांनी सांगितले की, ७-८ वर्षांपूर्वी भारतात इथेनॉलवर चर्चा दुर्लभ होती. आता इथेनॉल भारताच्या प्राधान्यक्रमात जोडले गेले आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा संकल्प आम्ही केला आहे. - २०१४ पर्यंत १ ते १.५ टक्का इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात होते. आता हे प्रमाण ८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे.- मोदी यांनी म्हटले की, हवामान बदलाबाबत भारत जागरूक आहे. या क्षेत्रात सक्रियतेने कामही करीत आहे. ६-७ वर्षांत भारताची नूतनीय ऊर्जा क्षमता २५० टक्क्यांनी वाढली आहे.