नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर अनेक प्रकारची रॉकेट आणि तोफा तैनात करून लष्कराने आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भारताच्या सीमेवर १०० के ९ वज्र होविएत्झर व यूएव्हीचा समावेश आहे. सीमेवर यापूर्वी के९ वज्र ट्रॅक्ड सेल्फ-प्रॉपेल्ड होविएत्झर, अल्ट्रा लाईट एम-७७७ होविएत्झर, पिनाक रॉकेट प्रणाली व धनुष्य गन सिस्टीम तैनात केलेले आहेत.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की, एलएसीवर ९० किलोमीटर पल्ल्याचे मानवविरहित हवाई वाहन (यूएव्ही) तैनात करण्याचा विचार सुरू आहे. १५ ते २० किलोमीटर पल्ल्याचे यूएव्ही खरेदी करण्याबरोबरच ८० किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्याची निगराणीची क्षमता असणारे यूएव्हीही खरेदी केले जाणार आहेत. सध्या बहुतांश सर्व यूएव्हीचे संचालन लष्कराच्या विमान युनिटकडून केले जाते. आणखी १०० के९ वज्र होविएत्झरचा ताफा खरेदी करण्याची तयारी सुरू आहे.