लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काँग्रेस आणि बहुतांश विरोधी पक्षांची गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचे संयोजक आणि जागावाटपाबाबत चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार समोर आले आहे. तसेच राज्यपातळीवरही वर्चस्व राखण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. तसेच इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांनी ४५० जागांची निश्चिती केली आहे जिथे संयुक्त उमेदवार उतरवण्याची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये ओदिशा, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधील जागांचा समावेश करण्यात आलेला नाही. या तिन्ही राज्यांमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या बीजेडी, बीआरएस, वायएसआर काँग्रेस हे कुठल्याही आघाडीत सहभागी झालेले नाही.
विरोधी पक्षांच्या आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र विरोधी पक्षांकडून ४५० जागांवर संयुक्त उमेदवार उतरवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जागावाटपाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यासाठी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांचा आधार बनवण्यात येण्याची तयारी आहे. जागा वाटपासाठी २०१९ च्या निकालानुसार रनरअप फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षांनी ज्या जागा जिंकल्या असतील त्या त्यांनाच मिळतील. त्याबरोबरच जे पक्ष ज्या जागांवर दुसऱ्या स्थानी असतील त्यांना त्या जागा दिल्या जातील.
आता हा फॉर्म्युला मान्य झाल्यास कुणाला किती जागा मिळतील असा प्रश्न समोर आला आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार २०१९ च्या कामगिरीच्या आधारावर काँग्रेसला २६१ जागा मिळू शकतात. २०१९ मध्ये काँग्रेसने ४२२ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. तर २०९ जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. तर ९९ जागांवर पक्ष तिसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे वरील फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २६१ जागा मिळतील.
महाराष्ट्राचा विचार केल्यास त्या निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर ३ जागांवर पक्ष दुसऱ्या स्थानी होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५ जागा जिंकल्या होत्या तर १५ जागांवर ते दुसऱ्या स्थानी होते. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना ठाकरे गटाला २१ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ४१ जागा मिळतील. उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाला ३६ जागा मिळू शकतात. बिहारमध्ये जेडीयूला १७ तर आरजेडीला १९ जागा मिळू शकतात. तामिळनाडूमध्ये डीएमकेला २३, सीपीआय(एम) ला १६, सीपीआयला ६, आप, रालोद, आययूएमएल, नॅशनल कॉन्फ्रन्स यांना प्रत्येकी ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. सीपीआय एमएलला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार महबुबा मुफ्ती यांना एकही जागा मिळणार नाही.
रनरअप फॉर्म्युला हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आकड्यांचा विचार केल्याच यामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यावर सहमती बनणेही कठीण आहे. इंडिया आघाडीची स्थापना होण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसने २०० जागा लढवाव्यात, असा सल्ला दिला होता. रनरअप फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २६१ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसला बंगालमध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. आपची दिल्ली आणि पंजाबमध्ये निर्विवाद सत्ता आहे. मात्र येथील २० पैकी केवळ ३ जागाच त्यांच्या खात्यात जातील. तर एकेकाळी डाव्या पक्षांचा बालेकिल्ला राहिलेल्या डाव्या पक्षांना बंगालमध्ये एकही जागा मिळणार नाही. मात्र ममता बॅनर्जींसाठी हा फॉर्म्युलासुद्धा फायदेशीर आहे. या फॉर्म्युल्यानुसार महाराष्ट्रा बहुतांश जागा ठाकरे गट आणि पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या फॉर्म्युल्यावर सर्वपक्षीयांचं कसं एकमत होईल, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.