नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संघटनेतर्फे (इस्रो) चंद्रावर यान पाठविण्याची ‘चांद्रयान-२’ ही दुसरी मोहीम पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असून हे उड्डाण जानेवारीच्या आधी होण्याची शक्यता दिसत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार ‘चांद्रयान-२’ यंदाच्या एप्रिलमध्ये झोपावण्याची योजना होती. मात्र गेल्या वर्षभरात दोन मोहिमांमध्ये आलेल्या अपयशानंतर ‘इस्रो’ घाई न करता कोणताही धोका न पत्करता चांद्रयान पाठविण्याच्या विचारात आहे. ‘इस्रो’चा एक अधिकारी म्हणाला की, ‘चांद्रयान-१’ व ‘मंगळयान’ या दोन्ही मोहिमा शतप्रतिशत यशस्वी झाल्या. आता पाठविले जाणारे यान चंद्रावर उतरणारे भारताचे पहिले यान असल्याने त्यात कोणतीही उणीव वा त्रुटी राहू नये, याची पूर्र्ण काळजी घेतली जात आहे.लष्करी दळणवळणासाठी काही महिन्यांपूर्वी ‘जीसॅट-६ए’ हा उपग्रह सोडला. पण संपर्क तुटल्याने तो उपग्रह वाया गेला. त्यानंतर फ्रेंच गियानामधील कौरु बेटावरून सोडला जायचा ‘जीसॅट-११’ उपग्रह ऐन वेळी त्रुटी लक्षात आल्याने तेथून परत आणावा लागला होता.‘चांद्रयान -२’ सोडण्यासाठी ठराविक दिवसांचा कालावधी अधिक उपयुक्त आहे. असा उपयुक्त काळ नजिकच्या भविष्यात जानेवारीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे हा अधिकारी म्हणाला.एप्रिलमध्ये ठरलेले ‘चांद्रयान-२’चे उड्डाण आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्षके. सिवान यांनी आधी सरकारला कळविले होते. त्यानंतर या मोहिमेच्या फेरआढाव्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय पातळीवरील समितीने प्रत्यक्ष यान सोडण्यापूर्वी आणखी काही चाचण्या करण्याची शिफारस केली होती.>८०० कोटींची मोहीम‘चांद्रयान-२’ मोहिमेत ‘इस्रो’ प्रथमच चंद्रावर एक छोटी गाडी (लॅण्ड रोव्हर) थेट उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. ही गाडी चंद्राच्या दक्षिण ध्रुवापाशी आजवर कोणीही न गेलेल्या ठिकाणी उतरविण्याची योजना आहे. या मोहिमेस ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भारताची दुसरी चांद्रवारी पुन्हा लांबणीवर, मोहिमेला ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 3:49 AM