संतोष ठाकूर ।नवी दिल्ली : अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढत्या मतभेदांमुळे अमेरिकेकडून रशियावर लादल्या जात असलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे येत्या दिवसांत भारताची सुरक्षेची चिंता वाढू शकते. त्याचे कारण म्हणजे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि इतर संरक्षण साहित्य विकत घेत असतो.या पार्श्वभूमीवर आर्थिक निर्बंधांमुळे खरेदी व्यवहारावर परिणाम होऊ शकतो म्हणून परराष्ट्र मंत्रालय अमेरिकेकडे आपली काळजी व्यक्त करण्याचा विचार करीत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक निर्बंधांमुळे आमची सुरक्षेची काळजी निश्चितच वाढली आहे. आम्ही अमेरिकेशी बोलून हा प्रश्न समजावण्याचा प्रयत्न करू. त्यातून आम्हाला आमच्या सुरक्षेची चिंता दूर करता येईल.आर्थिक निर्बंधांमुळे डॉलरमध्ये खरेदी करणे अवघड बनले व त्यामुळे ही खरेदी कोणत्या चलनात करायची हा प्रश्न निर्माण होईल. रूपया आणि रशियन चलनात व्यापार करण्यात तांत्रिक अडचणी आहेत. आम्ही आमची बाजू अमेरिकेला सांगण्याची तयारी करीत आहोत. आम्ही अमेरिकेला सांगू की ही शस्त्रे आम्ही आमच्यासाठीच खरेदी करीत नाही. त्यात अमेरिकेचेही हित आहे. एक अधिकारी म्हणाला, भारताकडून अफगाणिस्तानात अमेरिकेला मदत केली जात आहे. अशा वेळी भारताकडे शस्त्रे नसतील तर आम्ही तेथे मदत कशी करू शकणार? भारतीय सीमांवर अतिरेक्यांना तोंड देण्यासाठीही भारताला शस्त्रांची गरज आहे.
भारताची सुरक्षा चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:50 AM