नवी दिल्ली - भारत हा विस्तारवादी देश नसून शांतीप्रिय देश आहे, त्यामुळे भारताच्या जमिनीवर नजर ठेवणाऱ्यांना ठोस प्रत्युत्तर दिलंय जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखच्या भूमीवर जाऊन चीनला ठणकावले होते. मात्र, अद्यापही लडाखच्या सीमारेषेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताने सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातच, राफेल विमानाने भारतीय वायूदलात एंट्री केल्याने देशाची ताकद आणखी वाढली आहे. त्यातच, भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्र देण्याची तयारी सुरू आहे.
भारता-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्रांनी सज्ज करण्याची तयारी सुरू आहे. आयटीबीपीच्या 59 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दलातील जवानांना संबोधित करताना, केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी चीनवर हल्लाबोल केला. त्यासोबतच, भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कुणाचेही नाव न घेता त्यांनी चीनला ठणकावले. भारत हा वसुधैव कुटुम्बकम ( पृथ्वी हेच कुटुंब) वर विश्वास ठेवत आहे. तसेच, देशाची संस्कृती आम्हाला शस्त्र आणि अस्त्र दोन्हीची पूजा करायला शिकवते, असेही त्यांनी म्हटले.
आयटीबीपी स्थापना दिवसानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयटीबीपी जवानांच्या धाडसाला आणि वीरतेचं शब्दात वर्णन करणं शक्य नसल्याचं म्हटलंय. जगातील सर्वात कठीण प्रदेशात आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठीचं त्यांचं कार्य उल्लेखनीय असल्याचं शहा यांनी म्हटलंय.
आयटीबीपीकडून चीन व भारत या दोन्ही देशातील 3488 किमीच्या सीमारेषेचं संरक्षण करण्यात येत आहे. एलएसीवर तैनात होऊन हे जवान भारतमातेची सेवा करत आहेत. काही दिवसांपूर्वी आयटीबीपीच्या जवानांनी 15-16 जून रोजी भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक लढाईत रात्रभर आपल्या वीरतेचं दर्शन घडवलं. चीनच्या पीएलएच्या सैनिकांना ठोस प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवली, असेही शहा यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदी सरकार सैन्य दलास आधुनिक आणि ताकदवर बनविण्यासाठी दृढनिश्चयी आहेत. त्यामुळेच, आयटीबीपीच्या 47 सीमा चौकी स्थापन करण्यासाठी सामान, विशेष कपडे आणि अधिक उंचीवाल्या स्थानावर गिर्यारोहक उपकरणांच्याआधारे गृहमंत्रालयाकडून मंजूर देण्यात आली आहे. तसेच, आधुनिक शस्त्रांस्त्रांचाही पुरवठा करण्यात आला आहे. केंद्राने सन 2019-20 या आर्थिक वर्षात या सीमा सुरक्षा दलासाठी 7223 कोटी रुपयांचं बजेटही मंजूर केलं आहे.