नवी दिल्ली - हिंदी महासागरातील वर्चस्वाच्या चढाओढीमध्ये सोमवारी भारताला मोठे यश मिळाले आहे. सेशल्समध्ये नाविक तळ उभारण्यासाठी भारत आणि सेशल्समध्ये आज महत्त्वपूर्ण करार झाला. दोन्ही देशांचे हित विचारात घेऊन या नाविक तळाबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. या नाविक तळामुळे हिंदी महासागरात भारताचे बळ वाढणार आहे. काही दिवसांपूर्वीच सेशल्सने आपल्या असम्शन बेटांवर होऊ घातलेल्या भारताच्या नाविक तळाबाबतचा करार रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र या कराराबाबतच्या सेशल्सच्या शंका दूर झाल्यानंतर भारताचा येथे नाविक तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेला हा करार संरक्षणदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सेशल्सच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की आम्ही एकमेकांचे अधिकार मान्य करून असम्शन बेटांवरील नाविक प्रकल्पाबाबत एकत्रितपणे काम करण्यास सहमत झालो आहोत. तर आम्ही एकमेकांच्या हितांचा विचार करून या प्रकल्पावर एकत्र मिळून काम करू, असे सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे यांनी सांगितले.
हिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 5:14 PM