भारताने रविवारी लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीची माहिती देताना लष्करी शक्तीच्या दृष्टीने ही चाचणी म्हणजे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचे सांगितले. १५०० किमीपेक्षा अधिक मारक क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र सोबत विविध पेलोड्स नेण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताने ओदिशामधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या उड्डाणाची यशस्वीरीत्या चाचणी केली. हे एक ऐतिहासिक यश आहे. तसेच या चाचणीच्या यशामुळे अशाप्रकारचं महत्त्वपूर्ण आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
तर या चाचणीबाबत डीआरडीओने सांगितले की, या क्षेपणास्त्राला विविध रेंज सिस्टिमद्वारे ट्रॅक करण्यात आले आणि फ्लाइट डेटामधून टर्मिनल मेन्युवर्स आणि लक्षित क्षेत्रांच्या अचुकतेमध्ये ते यशस्वी ठरल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हे हवेच्या वरच्या थरामध्ये आवाच्या पाचपट अधिक वेगाने प्रवास करते. त्यावेळी याचा वेग ताशी ६ हजार २०० किमीपर्यंत असतो. याचा वेग हा आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या तुलनेत कमी आहे.