एस. पी. सिन्हा -
पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार रालोआत सामील झाल्यानंतर राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर महाआघाडीने रविवारी जनविश्वास महामेळाव्याद्वारे महाशक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याला संबोधित करताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. केंद्रातील सरकार समाजातील वंचित घटकांच्या ७३ टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, तर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘पलटूराम’ संबोधत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले.
काँग्रेस अध्यक्षांनी देशात महागाई शिगेला पोहोचल्याचे सांगत केंद्र सरकारची हीच हमी आहे का, असा सवाल केला. महामेळाव्यात काँग्रेसचे अध्यक्ष खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव, माकप नेते सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, भाकपा-मालेचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, आदी नेत्यांनी सहभाग घेतला.
महागाई शिगेला तरीही... सतत पारडे बदलण्याच्या सवयीमुळे नितीशकुमारांवर ‘रिल्स’ बनत असून, ते पाहून त्यांना काही वाटत नाही का? देशात महागाई शिगेला पोहोचली आहे, पण तरीही ‘आमची हमी’ म्हणत ते सर्वांना फसवत आहेत, असे खरगे म्हणाले.
बदलाची सुुरुवात बिहारमधून होतेदेशात आम्ही इंडिया आघाडीचे सरकार बनवू. जेव्हा-जेव्हा देशात बदलाचे वादळ येते, तेव्हा-तेव्हा त्याची सुरुवात बिहारमधून होते. बिहार हा बदलाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. एका बाजूला द्वेष, हिंसा, अहंकार आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रेम आहे. भारतीयांच्या मनात द्वेष नाही, प्रेम आहे. मग देशात द्वेष का पसरत आहे, असा प्रश्न पडतो, असे राहुल गांधी बोलताना म्हणाले.