ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - नेपाळमधील विनाशकारी भूकंपानंतर भारताने नेपाळला केलेल्या मदतकार्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरूवारी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विवटरवरून या संवादाबद्दल माहिती दिली आहे. ' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधून भारतातील विविध भागात भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच भारताने नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या बचावकार्याबद्दलही शरीफ यांनी प्रशंसा केली', असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' देशांनी एकत्र येऊन आपत्ती व्यवस्थापनाचा सराव करण्याचा प्रस्ताव आपण या चर्चेदरम्यान शरीफ यांच्यासमोर मांडल्याचेही मोदींनी नमूद केले आहे. शरीफ यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले असून 'सार्क' देशांनी पुढे येऊन प्रस्तावासंदर्भात निर्णय घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली, असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी मोदी व शरीफ यांनी अवकाळी पाऊस व त्याचा पिकांवर होणा-या परिणांमाबद्दलही चर्चा केल्याचे समजते.
गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत सुमारे ६ हजार नागरिक मृत्यूमुखी पडले असून भारतात ७८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड वित्तहानीही झाली असून नागरिक बेघर झाले आहेत.