नवी दिल्ली - भारतीय सैन्यानं आज पहाटे सर्जिकल सर्जिकल केल्याची माहिती असून, हा गेल्या तीन वर्षातला तिसरा स्ट्राइक आहे. गेल्या वर्षी उरी हल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून 40 ते 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याआधी 2105मध्येही भारतीय जवानांनी म्यानमार सीमेवर सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. आज पुन्हा एकदा भारतीय जवानांनी अशीच कामगिरी केली आहे. म्यानमारमध्ये शिरून नागा दहशतवाद्यांच्या कॅंम्पवर भारतीय लष्कराने हे सर्जिकल स्ट्राइक केल्याचं वृत्त आहे. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा या आधीच्या दोन सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती...
भारतीय लष्कराने घेतला 'उरी'चा बदला
गेल्यावर्षी उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 19 जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. अखेर दहा दिवसांनी भारतीय जवानांनी 28 सप्टेंबर 2016 रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक कारवाई करत 40 ते 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते.
लष्कराच्या दोन तुकड्यांमधील एकूण 7 प्लाटूननी हल्ल्यात सहभाग घेतला होता, कारण एकूण 7 लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त करायचे होते. प्रत्येक प्लाटूनमध्ये 15 ते 20 कमांडो होते. नियंत्रण रेषेवर आधीपासूनच डोग्रा आणि बिहार रेजिमेंटचे कमांडो होते. स्पेशल फोर्सच्या कमांडोचे सात प्लाटून नियंत्रण रेषेवर पोहोचल्यानंतर डोग्रा आणि बिहार रेजिमेंटच्या कमांडोंनी सीमेपलीकडे तोफांद्वारे हल्ला सुरु केला. कमांडोंकडे कर्ल-गुस्तोव रायफल्स होत्या, ज्या ग्रेनेड लॉन्चरसारख्या असतात. त्याचसोबत ज्वलनशील केमिकलही भारतीय जवानांकडे होते. प्रत्येक टीमकडे ड्रोन कॅमेरे होते आणि नाईट व्हिजन कॅमेरेही होते. ज्यांद्वारे काळोखातील चित्र स्पष्ट दिसण्यास मदत होत होती.
म्यानमारमध्ये घुसून एनएससीए-के च्या दहशतवाद्यांना लक्ष्य -
4 जून 2015 रोजी मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात एनएससीए-के या संघटनेच्या अतिरेक्यांनी डोग्रा रेजिमेंटच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आठवडयाभराच्या आतच 10 जूनला भारताच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी म्यानमारमध्ये घुसून एनएससीए-के च्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते. यात मोठया प्रमाणावर एनएससीए-के चे दहशतवादी मारले गेले होते. 100 पेक्षा जास्त दहशतवादी या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारले गेले होते.
काय असते सर्जिकल स्ट्राइक -
सर्जिकल स्ट्राइक म्हणजे अतिशय गोपनीय पद्धतीने दुसऱ्या देशात घुसून लष्करी कारवाई करणे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये असे ऑपरेशन राबवले होते. तसेच भारतानेही यापूर्वी पाकिस्तान व म्यानमारमध्ये असे ऑपरेशन राबवून दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी भारत पुन्हा सर्जिकस स्ट्राइक करू शकतो असा इशारा पाकिस्तानला दिला होता.