ऑनलाइन टीम
लंडन, दि. २१ - ईशांत शर्माच्या अखूड टप्प्याच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या खेळाडुंनी सपशेल नांगी टाकल्यामुळे भारताने दुस-या कसोटीमध्ये इंग्लंडवर क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर थरारक विजय मिळवला आहे. विजयासाठी ३१९ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर होते. परंतु २२३ धावांवर भारताने इंग्लंडचा धाव गुंडाळला आणि भारताला चित्तथरारक विजय मिळवून दिला.
पहिल्या डावात अजिंक्य रहाणे आणि दुस-या डावात मुरली विजय, रविंद्र जाडेजा व भुवनेश्वर कुमार यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडसमोर चांगले आव्हान ठेवले होते. ज्यो रूटने अर्धशतक झळकावत मोईन अलीच्या साथीने चांगला खेळ केला आणि इंग्लंडला विजयाची आशा दाखवली. परंतु, ईशांत शर्माच्या उपहारानंतरच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज निष्प्रभ ठरले.
भारताने पहिल्या डावात २९५ व दुस-या डावात ३४५ धावा केल्या. बॅलन्सच्या शतकाच्या जीवावर इंग्लंडने पहिल्या डावात ३१९ धावा केल्या. दुस-या डावात विजयासाठी इंग्लंडपुढे ३१९ धावांचे लक्ष्य होते. मोईन अली, रुट, स्टोक्स, प्रायोर व ब्रॉड असे पाचजण एकामागोमाग एक तंबूत धाडणा-या ईशांत शर्माने एकूण सात बळी टिपले व विजयात मोलाचा वाटा उचलला.