केवडिया : गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडातही भारताची एकता देशाच्या शत्रूंना बोचते. भारताचे शत्रू देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रयत्नांविरुद्ध देशाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले.
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तेव्हा ते बोलत होते. मोदी म्हणाले की, देशाच्या शत्रूंनी भारताचे विभाजन करण्यासाठी सर्वकाही केले. तरीही आपण त्यावर मात करू शकलो, कारण एकतेचे अमृत आपल्यात जिवंत होते. आपण आजही खूप सावध राहायला हवे. भूतकाळात ज्या शक्तींनी भारताला त्रास दिला, त्या आजही आहेत. आजही त्या आपल्यात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आपण खंबीर रहायला हवे, असे मोदी यावेळी म्हणाले.
मी कर्तव्याच्या मार्गावर
मी एकता नगरमध्ये असलो तरी मनाने मोरबीतील पीडितांसोबत आहे. एका बाजूला वेदनामय हृदय आणि दुसऱ्या बाजूला कर्म व कर्तव्याचा मार्ग. या कर्तव्यपथाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. पण माझे अंतःकरण त्या शोकाकूल कुटुंबांसोबत आहे, असे ते म्हणाले.
आजचा भारत पटेलांसारख्या नेत्यांमुळे
सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी भारताच्या एकात्मतेचे नेतृत्व केले नसते तर परिस्थितीची कल्पना करणेही कठीण आहे. पाचशेहून अधिक संस्थानं एकत्र झाली नसती तर? आज आपण जो भारत पाहतो आहोत, त्याची कल्पनाही करता आली नसती. हे अवघड, अशक्य काम फक्त आणि फक्त सरदार पटेलांनीच पार पाडलं, असे पंतप्रधान यांनी सांगितले.