ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २७ - उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (सार्क) बैठकीत भारत सहभागी होणार नाही. नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद येथे सार्क परिषद होणार होती.
यापूर्वी अफगाणिस्तानचे राजदूत शायदा मोहम्मद अब्दाली यांनी पाकमध्ये होणाऱ्या सार्कच्या बैठकीत सर्वांनी बहिष्कार टाकावा, अशी भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, दहशतवादाच्या माध्यमातून प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य भंग करणा-या पाकिस्तानविरोधात आता सर्व देशांनी एकत्र यायची वेळ आली आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्यावर विचार केला पाहिजे, असेही शायदा मोहम्मद अब्दाली यांनी सांगितले होते.
दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी नुकत्याच पार पडलेल्या सार्क देशांच्या परिषदेच्या आधी असे वक्तव्य केले होते की, पाकिस्तान आणि भारत यांच्यादरम्यान काश्मीर हाच महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मध्यस्थीनेच सुटला पाहिजे. काश्मिरी जनतेला तिचा स्वयंनिर्णयाचा जन्मसिद्ध अधिकार दिलाच गेला पाहिजे. हेच नेमके साऱ्या वादाचे मूळ आहे. त्यामुळे जोवर काश्मीरचा पेच सुटत नाही तोवर सार्क देशांच्या परिषदेत व्यापाराच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकत नाही आणि या देशांतर्गत व्यापाराच्या माध्यमातून त्यांना प्रगतीही साधता येणार नाही.