बंगळुरू - विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपासमोर सरकार वाचवण्याचे आव्हान आहे. तर काही दिवसांपूर्वीपर्यंत आघाडीचे सरकार चालवणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील आघाडीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. दरम्यान, या सर्वांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुमारस्वामी आम्हाला पाठिंबा देतील किंवा नाही यावरून आम्हाला काहीही फरक पडत नाही, सध्यातरी ज्या आमदारांनी बंडखोरी करून पक्ष सोडला आहे. अशांना पराभूत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
भाजपा आणि जेडीएसमधील वाढत्या जवळीकीविषयी प्रतिक्रिया देताना सिद्धारामय्या म्हणाले की,’’कुमारस्वामी आम्हाला पाठिंबा दिला किंवा नाही दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सध्यातरी विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या बंडखोर आमदारांपैकी कुणीही जिंकून येणार नाही याचा बंदोबस्त करण्यास आमचे प्राधान्य आहे.’’
जेडीएसचे ज्येष्ठ नेते बसवराज होराती यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते.’’पाच डिसेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर जर येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमतासाठी आमदारांची संख्या कमी पडत असेल तर आमचा पक्ष येडियुरप्पा सरकारला पाठिंबा देऊ शकतो. सध्याच्या स्थितीत राज्यातील भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही पक्षांपैकी एकाही पक्षाचे आमदार सरकार पाडून मध्यावधी निवडणूक घेण्यास इच्छुक नाहीत.’’असे होराती म्हणाले होते.