राजेंद्रकुमार, लोकमत न्यूज नेटवर्क
लखनौ : उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाममंत्री मंत्री जितीन प्रसाद व जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खटिक यांनी योगी सरकारच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.
खटिक यांनी राजीनामापत्र मुख्यमंत्री व राज्यपालांना तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले आहे. नमामि गंगे योजनेतील भ्रष्टाचार, बदल्या, मंत्र्याने कोणतेही काम न देणे, तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आपण दलित असल्यामुळे अधिकाऱ्यांनी उपेक्षा केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.
अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे योगी सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री नाराज आहेत. जितीन प्रसाद व उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांच्या नाराजीची वेगळी कारणे आहेत. या दोन खात्यांमध्ये झालेल्या बदल्यांपासून मुख्यमंत्री स्तरावर मोठ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही. तर पाठक यांनी बदल्यांबाबत आरोग्य अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून उत्तर मागितले होते, ते अद्याप मिळालेले नाही. ते वारंवार आरोग्य विभागाला लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते; परंतु खात्याचे अधिकारी त्यांचे ऐकतच नाहीत.
नाराजी दूर केली जाणार?
जितीन प्रसाद व दिनेश खटिक केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर हा प्रकार घालण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. लवकरच केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्यांसमवेत नाराज मंत्र्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.