नवी दिल्ली : वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची जुनी मागणी मान्य होण्याचे संकेत मिळत आहेत. वाहन उद्योगाची ही मागणी योग्य असून, त्यासाठी लवकरच आपण पंतप्रधान तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याची माहिती अवजड उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सीयाम)च्या हीरकमहोत्सवी वार्षिक संमेलनात जावडेकर यांनी वरील माहिती दिली. देशातील वाहनांची मागणी वाढावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी सर्वसंबंधितांचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
वाहनांवरील जीएसटी हा कायमस्वरूपी कमी करण्याची मागणी केली जात नसल्याचे स्पष्ट करून जावडेकर म्हणाले की, तुमची ही मागणी सध्याच्या परिस्थितीत व्यवहार्य असल्याने मी यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विनंती करीन. ही मागणी कदाचित तातडीने मान्य होणार नसली तरी हा नकार अंतिम मानू नका असे आवाहनही त्यांनी वाहन निर्मात्यांना केले आहे.
दुचाकी वाहने चैनीची गोष्ट नसून, ती सर्वसामान्यांच्या गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे त्यावरील जीएसटी कमी करण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण दिसत नसल्याचे जावडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. कपातीमुळे सरकारचा फायदा नसल्याचेही ते म्हणाले.कोणत्याही वस्तूवरील जीएसटीचे दर कमी अथवा जास्त करण्याचा अधिकार हा जीएसटी परिषदेचा असून, त्यामध्ये सर्वच राज्यांचे अर्थमंत्री सहभागी असतात. जीएसटी परिषदेतर्फे वाहनांवरील जीएसटी कमी करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येणार असल्याचे समजते.