श्रीहरीकोटा : आयआरएनएसएस-१ ई हा पाचवा दिशादर्शक उपग्रह बुधवारी यशस्वीरीत्या कक्षेत स्थिरावताच भारताने अमेरिकेच्या जागतिक स्थितीदर्शक यंत्रणेच्या धर्तीवर (जीपीएस) स्वत:ची दिशादर्शक यंत्रणा विकसित करणाऱ्या देशांच्या रांगेत स्थान मिळविले आहे.पीएसएलव्ही सी ३१या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाने सकाळी ९.३१ वाजता स्थानिक सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजनानुसार उड्डाण केले. अवघ्या १९ मिनिटे २० सेकंदात सदर उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या तुकडीचे अभिनंदन केले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.दीर्घ पल्ला गाठायचा आहेयशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांना आनंद लपवून ठेवता आला नाही. नववर्षाच्या प्रारंभीच आम्ही भारतीय क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील पाचव्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्यामुळे देशाला २४ तास स्थितीदर्शक अचूक माहिती पुरविणे शक्य होईल. येत्या दोन महिन्यांत आणखी दोन उपग्रह सोडले जातील. आम्हाला दीर्घ वाटचाल करायची असून यावर्षी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाच्या प्रक्षेपणाची योजना आहे. तूर्तास मला आमच्या संपूर्ण तुकडीचे अभिनंदन करायचे आहे, असे ते मिशन कंट्रोल सेंटर येथे प्रतिक्रिया देताना म्हणाले. (वृत्तसंस्था)1 आयआरएनएसएस-१ ई हा पाचवा दिशादर्शक उपग्रह असून या यंत्रणेत एकूण सात उपग्रहांचा समावेश आहे. ४८ तासांची उलटगणती संपताच प्रक्षेपकाने स्वच्छ निळ्या आकाशाला छेदत अंतराळात प्रवेश केला. 2 चार टप्प्यातील पीएसएलव्ही प्रक्षेपकाने मोहीम फत्ते करताच मिशन कंट्रोल कक्षात उपस्थित शास्त्रज्ञांनी टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोश केला.3 या उपग्रहाने नव्या भूस्थिर कक्षेत प्रवेश (जीटीओ) करताच आयआरएनएसएस-१ ई या उपग्रहाचे दोन सौर पॅनेल आपोआपच उघडले जातील. हसन येथील मास्टर कंट्रोल यंत्रणेद्वारे त्यानंतर या उपग्रहाचा ताबा घेतला जाणार असून कक्षाविस्ताराचे काम सुरू केले जाईल. 4 यापूर्वी पाठविण्यात आलेले चार उपग्रह या यंत्रणेचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसे असले तरी उर्वरित तीन उपग्रह अचूकता आणि परिणामकारकता वाढविण्याचे काम करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.