Indigo Airline:इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीला दिल्लीहून पाटण्याला जायचे होते, पण त्याला 1400 किमी दूर उदयपूरला नेण्यात आले. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना 30 जानेवारी (सोमवार) ची असून प्रवाशाला दुसऱ्या दिवशी त्याच्या इच्छित स्थळी रवाना करण्यात आले.
अफसर हुसैन असे प्रवाशाचे नाव आहे. डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अफसर हुसैन नावाच्या प्रवाशाने इंडिगो फ्लाइट 6E-214 द्वारे पाटण्याला जाण्यासाठी तिकीट बुक केले होते आणि नियोजित फ्लाइटमध्ये चढण्यासाठी 30 जानेवारी रोजी दिल्ली विमानतळावर पोहोचला. पण चुकून तो इंडिगोच्या उदयपूर फ्लाइट 6E-319 मध्ये चढला.
उदयपूर विमानतळावर उतरल्यानंतरच प्रवाशाला चूक लक्षात आली. यानंतर त्याने उदयपूर विमानतळावरील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाची माहिती विमान कंपनीला दिली. एअरलाइन्सने त्याला त्याच दिवशी दिल्ली आणि नंतर 31 जानेवारीला पाटणा येथे परत आणले. DGCA अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही या प्रकरणी अहवाल मागवत आहोत आणि विमान कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल."
विशेष म्हणजे, गेल्या 20 दिवसांत इंडिगोच्या फ्लाइटमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 13 जानेवारी रोजी इंदूरसाठी फ्लाइट तिकीट आणि बोर्डिंग पास असलेल्या एका प्रवासी चुकीच्या फ्लाइटमध्ये चढला आणि त्याला नागपूरला नेण्यात आले.