नवी दिल्ली- गेल्या दोन आठवड्यात तिसऱ्यांदा प्रवासादरम्यान एअरक्राफ्टमधील इंजिन फेल होण्याची घटना गंभीरतेने घेत सिव्हील एविएशन रेग्युलेटरने कठोर पाऊल उचललं आहे. सोमवारी डीजीसीएने (नागरी विमान उड्डाण महासंचालनालय) 11 विमानं तात्काळ हटविण्याचा आदेश जारी केला. यातील 8 विमानं इंडिगो एअरलाइन्सची आहेत तर 3 विमानं गोएअरची आहेत. इंजिनांमधील बिघाडामुळे विमानांना सेवेतून बाहेर काढल्याने मंगळवारी अनेक मार्गांवरील सेवांवर परिणाम झालेला पहायला मिळाला.
इंडिगोला आपली 47 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत तर गोएअरची 18 रद्द झाली आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, पाटणा, श्रीनगर, भुवनेश्वर, अमृतसर, श्रीनगर आणि गुवाहाटीसह इतर शहरात जाणाऱ्या व येणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. सोमवारी इंडिगोच्या एका विमानाचं इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अहमदाबाद एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. प्रँट अॅण्ड विटनी इंजिनची खास सिरीज असणाऱ्या त्या 11 A320 निओ विमानांना हटविण्यात यावं, असं निर्देश या घटनेच्या काही तासातच डीजीसीएने इंडिगो आणि गोएअरला दिले.
एक खास सीरिज असणारे एकुण 14 ए 320 निओ विमानं सेवेतून हटविण्यात आली आहे. यामधील 11 विमानांचा उपयोग इंडिगो करत होती तर 3 विमानं गोएअरची होती. 11 विमानांची उड्डाणं रद्द केल्यानंतर मंगळवारी देशातील विविध एअरपोर्टवर अनेक प्रवासी रखडून पडले होते. सोमवारीही अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.