विमानात डास असल्याची तक्रार केल्यामुळे प्रवाशाला उतरवण्यात आल्याचा प्रकार लखनऊ विमानतळावर घडला आहे. बंगळुरुचे डॉ. सौरभ राय सोमवारी सकाळी लखनऊतील विमानतळावरुन प्रवासासाठी निघाले होते. इंडिगोच्या विमानात पोहोचल्यानंतर राय यांनी मोठ्या प्रमाणात डास असल्याची तक्रार केली. या तक्रारीमुळे आपल्याला विमानातून उतरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर राय यांनी धमकी दिल्याने आणि हायजॅक हा शब्द वापरल्याने सुरक्षेच्या नियमांनुसार कारवाई केल्याचे स्पष्टीकरण इंडिगोने दिले. डॉ. राय सोमवारी सकाळी ६ वाजता इंडिगोच्या विमानात चढले. यानंतर काही वेळातच त्यांनी विमानात मोठ्या प्रमाणात डास असल्याची तक्रार केली. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. यामुळे राय यांचा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कर्मचाऱ्यांनी राय यांना विमानातून उतरण्यास सांगितले. एका महिन्याआधीही इंडिगोचे कर्मचारी वादात सापडले होते. नवी दिल्ली विमानतळावर कर्मचाऱ्याने प्रवाशाला धक्काबुक्की केल्याने इंडिगोवर टीका झाली होती.
डास असल्याची तक्रार केल्यानं इंडिगोनं प्रवाशाला उतरवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 11:52 AM