मुंबई- गेल्या काही महिन्यांमध्ये विमानामध्ये गोंधळ घालणे, विमानात तांत्रिक बिघाड होणे किंवा विमान उशीरने टेकऑफ करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अलीकडेच टीव्ही कलाकार कपिल शर्मा Indigo च्या विमानाने उशीरा टेकऑफ केल्यामुळे कंपनीवर चांगलाच खवळला होता. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे.
पूर्वी उशीराने उड्डाण करण्याच्या बाबतीत एअर इंडिया आघाडीवर होते. अनेकदा एअर इंडियाच्या विमानाने उशीरा उड्डाण केल्याचा प्रकार घडला आहे. पण, आता Indigo च्या विमानाने उशीराने उड्डाण करणे सुरू केले आहे. आज दिल्लीवरुन मुंबईकडे येणाऱ्या विमानात असाच प्रकार घडला. 7.15 ला दिल्लीवरुन मुंबईकडे येणारे इंडिगोच्या विमानाने सूमारे एक तास उशीराने उड्डाण केले.
पाच-दहा मिनिटात टेकऑफ होईल, असे सुरुवातीला सांगण्यात आले. नंतर, क्रू मेंबर येताहेत, असे सांगण्यात आले. त्यानंतर रन-वेवर दुसरे विमान आहे, त्यामुळे उशीर होईल, असे सांगण्यात आले. विविध कारणे देत अखेर एका तासानंतर विमानाने उड्डाण केले. यामुळे विमानातील प्रवाशांना चांगलाच मनस्थाप झाला.
कपिल शर्मा काय म्हणाला होता?दरम्यान, इंडिगोच्या विमनाने प्रवास करणाऱ्या कपिल शर्मासोबत असाच प्रकार घडला. बुधवारी तो चेन्नईहून मुंबईसाठी विमानाने येत होता. मात्र, विमानाचा पायलट ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने त्याला विमातळावर पोहोचण्यास विलंब झाला आणि त्यामुळे विमान दोन तासांपेक्षा जास्त काळ खोळंबले. सुरुवातीला विमान कंपनीने काहीच कारण सांगितले नाही. प्रवासी मात्र वाट पाहात तसेच उभे होते. मग कपिलने आपल्या सोशल मीडियावर या ताटकळणाऱ्या तसेच व्हीलचेअरवर विमानाची वाट पाहात बसलेल्या काही प्रवाशांचे व्हिडीओ शेअर करत ही विमान कंपनी खोटारडी असल्याचे थेट भाष्य केले. कपिलने या विमान विलंबाची केलेल्या पोस्टवरील प्रतिक्रियांद्वारे अनेकांनी अनेक विमान कंपन्यांवर टीकेची झोड उठवली.