कोलकाता- इन्फाळहून कोलकात्याला येणा-या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या वैमानिकाला उड्डाणादरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला. विमान हवेत असतानाच वैमानिकाला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्यातही त्यांनी प्रसंगावधान दाखवत विमानाचं कोलकातातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरीत्या लँडिंग केलं. ही घटना शनिवारी घडली होती.63 वर्षीय वैमानिक सिल्वियो डियाज अकोस्टा कोलकात्यात विमानाचं लँडिंग करत असतानाच त्यांच्या छातीत जोरात दुखू लागले आणि ते घामाघूम झाले. सिल्वियो यांनी याची तक्रार सहकारी वैमानिकाकडेही केली. अशातच त्या मुख्य वैमानिकानं सहकारी वैमानिकाला सांभाळत विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवलं. त्यानंतर एअरपोर्ट मेडिकल युनिटमध्ये त्यांना पाठवण्यात आलं. तिथे ईजीसी केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं. त्यानंतर लागलीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.डॉक्टरांच्या माहितीनुसार, अकोस्टा यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांनी जे केलं कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही ज्या धैर्यानं अकोस्टा यांनी विमानाचं लँडिंग केलं, ते एखाद्या चमत्कारासारखंच आहे. वैमानिक अकोस्टा सुरक्षित आहेत, सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
विमान हवेत असतानाच वैमानिकाला आला हार्ट अटॅक, प्रसंगावधान दाखवत वाचवले प्रवाशांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 10:31 AM