श्रीनगर - श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठा अपघात सुदैवाने टळला. श्रीनगरहून २३३ प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान विमानतळावर बर्फाला धडकले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या प्रकारानंतर विमानातील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. तसेच या घटनेच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी इंडिगोचे विमान क्र. ६ई २५५० हे २३३ प्रवाशांना घेऊन श्रीनगरहून दिल्लीकडे निघाले होते. तेव्हा रनवेवरून उड्डाण करत असतानाच या विमानाचे इंजिन रनवेच्या टोकाला साठलेल्या बर्फावर आदळले. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान थांबवले. हा प्रकार पाहताच विमानतळावर तैनात असलेल्या अग्निशमन आणि आपातकालिन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, विमानाचे इंजिन बर्फावर आदळल्यानंतर विमानात जोरदार धक्का बसला. त्यामुळे विमानातील प्रवासी घाबरले होते. या प्रवाशांना विमान थांबल्यानंतर तातडीने बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे विमानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या विमानाच्या इंजिनाची तपासणी करण्यात येत आहे.मात्र या प्रकारामुळे विमानतळावर बराचकाळ गोंधळाचे वातावरण दिसून आले. रनवेवरून उड्डाण करत असताना विमानाचे इंजिन बर्फावर आदळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडत असून, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे धावपट्टीवर बर्फाचे थर साठल्याने श्रीनगर विमानतळ काही दिवस बंद होता. बर्फ हटवल्यानंतर विमानतळ सुरू झाला आहे.