नवी दिल्ली - देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. एक कणखर नेत्या, 'आयर्न लेडी' म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते. त्यामुळे अनेक कठोर प्रसंगांना इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले होते. मात्र, इंदिराजींच्या याच धाडसी बाण्याचे कौतुक अनेक वर्षं होत आहे.
इंदिरा गांधी यांनी 1971 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्धात अतुलनीय राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा दाखविला होता. या युद्धात पाकिस्तानची धूळधाण झाली. पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांग्लादेश अस्तित्वात आला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे हे यश अद्वितीय होते. त्यानंतर त्या 'दुर्गा' म्हणूनच प्रसिद्ध झाल्या. त्यांना ही उपमा अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्याचं काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं होतं, परंतु वाजपेयींनी वारंवार त्याचं खंडन केलं होतं. 1971 च्या युद्धातील विजयाबद्दल मी इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली होती. तथापि, त्यांना दुर्गेची उपमा दिली नव्हती, असा खुलासा त्यांनी एका कार्यक्रमात केला होता. तसंच, वाजपेयी यांचे सर्वात जवळचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘मेरा देश, मेरा जीवन’ या आपल्या आत्मचरित्रातही याबाबत स्पष्टीकरण केलंय. इंदिरा गांधी यांना दुर्गेची उपमा वाजपेयी यांनी नव्हे, तर अन्य एका सदस्याने दिली होती, असे अडवाणी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
त्याकाळी संसदेतील कामकाजाच्या रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड होऊ शकलेले नाही, पण दुर्गा हे विशेषण इंदिरा गांधींच्या नावापुढे कायमचं जोडलं गेलं आहे.