नवी दिल्ली - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आदरांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्यावतीने देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 'आयर्न लेडी' म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते. त्यामुळे अनेक कठोर प्रसंगांना इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले होते. मात्र, इंदिराजींच्या याच धाडसी बाण्याचे कौतुक अनेक वर्षं होत आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती.
इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. ज्यांच्या अढळ निर्णयांनी जगाला भारतापुढे झुकायला भाग पाडलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. भारतानं त्यांच्या कार्यकाळात अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार थोपवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारत आण्विक संपन्न देश झाला. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला विरोधकांनी नेहमीच विरोध केला. परंतु त्या कोणालाही न जुमानता देशाहिताचे निर्णय घेत राहिल्या. त्यामुळेच त्यांना 'आयर्न लेडी' म्हटलं जातं.