ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - भारताच्या टपाल खात्याने २००८ मध्ये प्रकाशित केलेली इंदिरा गांधी व राजीव गांधीचे टपाल तिकीट आता हद्दपार होणार आहे. याऐवजी केंद्र सरकार आता दिनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण या नेत्यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उघड झाली आहे.
२००८ मध्ये यूपीए सरकारने इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ तिकीटे प्रसिद्ध केली होती. नवीन आठ तिकीटांच्या मालिकेत याचा समावेश करण्याता आला होता व तिकीटांचे मूल्य ५ रुपये एवढे होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने टपाल तिकीटासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. यात सरकारने ५ रुपयांच्या तिकीटांची मालिका बंद करणार असल्याचे म्हटले आहे. या मालिकेत फक्त राजीव गांधी व इंदिरा गांधीवरील तिकीटांचा समावेश होता. याऊलट आगामी काळात सरकारतर्फे दिनदयाळ, उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं प्रकाशित केली जातील असेही सरकारने स्पष्ट केले.
आगामी काळात भाजपा सरकार छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, पंडित भीमसेन जोशी आदी मान्यवरांवरील तिकीटांची नवी मालिका सुरु करणार असल्याचे समजते.