नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक दिसत असल्याचे सर्वसामान्यांना वाटत असताना स्वत: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही अंतिम दिवसात चिमुकल्या प्रियंकामध्ये आपला राजकीय वारस शोधला होता आणि तशी इच्छाही बोलून दाखविली होती, असा दावा त्यांचे दीर्घकाळ राजकीय सल्लागार राहिलेल्या माखनलाल फोतेदार यांनी एका पुस्तकात केला आहे.प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवावी अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाने सातत्याने चालविली आहे. विशेषत: गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर या मागणीने जोर धरला होता. चिमुरड्या प्रियंकामध्ये भविष्यात मोठा नेता बनण्याचे सर्व गुण आहेत, असे इंदिराजींना मनोमन वाटत होते. तिच्यात त्या स्वत:ची प्रतिमा शोधत होत्या, असेही त्यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. प्रियंका ह्या मोठ्या नेत्या बनतील. पुढील शतक त्यांचेच राहील, असेही इंदिरा गांधींनी आत्मविश्वासपूर्वक म्हटले होते. इंदिरा गांधी यांची हत्या होण्याच्या तीन दिवस आधी आम्ही काश्मिरात होतो. तेथे मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही स्वस्थपणे बसलो असताना इंदिराजींनी प्रियंकाविषयी असे उद्गार काढले होते, अशी माहिती फोतेदार यांनी पुस्तकात दिली आहे. आपला अंत जवळ आला असेच कदाचित त्यांना सूचित करायचे होते. त्यांचे शब्द मला खरेच महत्त्वाचे वाटत होते. त्या प्रियंकांबाबत जे बोलल्या ते मी त्या रात्री लिहून काढले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)पुढील शतक प्रियंकांचे...इंदिराजींना चारित्र्याची चांगली जाण होती. त्यामुळेच त्यांना प्रियंकांनी आपला राजकीय वारसा पुढे चालवावा असे वाटत होते. इंदिराजींच्या हत्येनंतर एकदा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी बोलताना मी इंदिराजींचे प्रियंकांबद्दलचे मत सांगितले होते. मला इंदिरा गांधी आणि प्रियंका यांच्यात बरेच साम्य दिसते. एक नेत्या म्हणून इंदिराजींकडे असलेली आक्रमकता आजच्या प्रियंका गांधी-वड्रा यांच्यात दिसते. त्यावेळी इंदिराजी म्हणाल्या होत्या, पुढील शतक प्रियंकांचे असेल. त्यासाठी प्रतीक्षा करा, असेही फोतेदार म्हणाले.
३० रोजी प्रकाशन...इंदिरा गांधी यांची नवी दिल्लीत ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी हत्या झाली होती. एकेकाळी गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलेल्या फोतेदार यांच्या ‘चिनार लिव्हज्’(चिनारची पाने) हे पुस्तक ३० आॅक्टोबर रोजी दिल्लीत प्रकाशित केले जाणार आहे.