नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर.के.धवन यांचे आज निधन झाले, ते 81 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राज्यसभा खासदार राहिलेले आर.के.धवन इंदिरा गांधींचे सचिवही होते. धवन यांच्या निधनानंतर काँग्रेसने शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते आर.के. धवन हे इंदिरा गांधींच्या हत्येचे प्रत्यक्षदर्शी असल्याचे सांगण्यात येते. मी गांधी कुटुंबाचा प्रामाणिक सेवक असून या कुटुंबाची निष्ठापूर्वक सेवा करण्यातच आपले जीवन समर्पित करणार असल्याचे धवन यांनी म्हटले होते. त्यामुळेच आपण उशिरा लग्न केल्याचा दावाही ते करत. धवन यांचे लग्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले होते. धवन यांना वायरल इन्फेक्शनचा आजार होता. त्यावेळी, धवन यांची सेवासुश्रूषा करण्याचे काम अचला मोहन नावाची महिला करत. मात्र, आपल्या वयाच्या 74 वर्षी धवन यांनी अचला मोहनशी विवाह केला. त्यावेळी, अचला मोहनचे वय 59 वर्षे होते.