इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षाची जागतिक स्तरावर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:33 AM2017-11-20T04:33:01+5:302017-11-20T04:33:38+5:30
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्मरणदिनी सोनिया गांधी, राहुल व वरुण गांधींसह सारे गांधी कुटुंबीय तसेच अखिल भारतीय काँग्रेसने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्मरणदिनी सोनिया गांधी, राहुल व वरुण गांधींसह सारे गांधी कुटुंबीय तसेच अखिल भारतीय काँग्रेसने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. जागतिक स्तरावर विविध देशांत या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. राजघाटाजवळील इंदिरा गांधींच्या शक्तिस्थळावर प्रतिवर्षाप्रमाणे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. १, सफदरजंग मार्गावर इंदिरा गांधी स्मृती स्थळावर पुष्पचक्रे वाहण्यात आली. पंतप्रधान मोदींनीही औपचारिकरीत्या इंदिराजींचे स्मरण केले. तथापि, देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान करणा-या इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षाची अथवा त्यांच्या १०० व्या जन्म दिनाची केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारला दखल घ्यावीशी वाटली नाही. उलट याच दिवशी मोदी सरकारने पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रांसह प्रमुख वृत्तपत्रांत ‘विश्व शौचालय दिनाच्या’ पूर्ण पानभर जाहिराती प्रसिद्ध केल्या.
इंदिराजींचा ‘आयर्न लेडी’ असा उल्लेख करीत सोनिया गांधी म्हणाल्या, एका अपूर्व धेयासक्तीने आयुष्यभर इंदिराजींनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये जोपासली. धर्म व जातींच्या भिंती उभ्या करून समाजाचे विभाजन घडविणाºया स्वार्थी व हितसंबंधी शक्तींविरुद्ध कडवी झुंज दिली. प्रिय आजीचे स्मरण करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली, तर भाजपचे खासदार व इंदिराजींचे नातू वरुण गांधींनी इंदिराजींबरोबरचे आपल्या बालपणातले छायाचित्र टष्ट्वीट करीत इंदिराजींचा उल्लेख ‘राष्ट्रमाता’ असा केला. वरुण म्हणतात की, ‘प्रिय आजी आमच्याकडे आजही तुम्ही लक्ष ठेवून आहात, याची मला कल्पना आहे. तुम्हीच माझ्या खºया प्रेरणास्थान व मार्गदर्शक आहात. तुमचे छायाचित्र पाहिले तरी मनात धाडस संचारते. आज मी तुम्हाला खरोखर खूप मिस करतोय. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी, इतिहासाच्या पानातून इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची अलौकिक कारकीर्द कधीही पुसता येणार नाही, अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या अध्यक्षतेखालील इंदिरा गांधी मेमोरिअल ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळाने याच दिवसाचे निमित्त साधून २००४ ते २०१४ या कालखंडात भारताचे नेतृत्व करताना जागतिक स्तरावर भारताचा सन्मान अत्युच्च स्तरावर नेल्याबद्दल माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण व विकास पुरस्कारासाठी एकमताने निवड केल्याची घोषणा केली. ट्रस्टचे संचालक सुमन दुबे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
>छायाचित्र प्रदर्शन
इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात आलेल्या ‘इंदिरा अ लाइफ आॅफ करेज’ या शीर्षकाचे एक प्रदर्शन दिल्लीच्या इंदिरा गांधी स्मृती न्यासाने आयोजित केले आहे. या प्रदर्शनात इंदिराजींच्या विवाहाची खरी निमंत्रण-पत्रिका, कमला नेहरूंच्या निधनानंतर महात्मा गांधींनी इंदिराजींना लिहिलेले पत्र, तसेच इंदिराजींच्या जीवनाशी संबंधित पूर्वी कधीही न पाहिलेली ३०० पेक्षा अधिक दुर्लभ छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.