प्रबळ भागिदारी : स्वराज यांची पश्चिम आशियातील पहिलीच भेट
नवी दिल्ली: भारत आणि इस्रायल यांच्यामधील संबंध अधिकाधिक दृढ होण्याचा दिशेने दोन्ही देशांचे सरकार सध्या प्रयत्नशील असल्याचे दिसते. २०१४ पासून दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट भेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. आता सुषमा स्वराज भारताच्या परराष्ट्रमंत्री झाल्यापासून पश्चिम आशियाच्या दौºयावर जात आहेत. यापुर्वी सुषमा स्वराज यांनी २००८ साली भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळासह इस्रायलला भेट दिली होती, मात्र परराष्ट्रमंत्री या नात्याने ही त्यांची पहिलीच भेट आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना इस्रायलला भेट दिली होती. तसेच २०१५मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इस्रायलला भेट दिली आहे.
मध्यपुर्वेच्या बाबतीत महत्वाची भेट...
१३ जानेवारी रोजी सीरियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री वालिद-अल-मोअलेम यांनी सुषमा स्वराज यांची राजधानी नवी दिल्लीमध्ये घेतलेली भेट आणि आता स्वराज यांचा हा होणारा दौरा यामुळे मध्य-पूर्वेत भारताचे मुत्सद्दी संबंध अधिक घट्ट होणार आहेत. १७ आणि १८ जानेवारी या दोन दिवसांमध्ये त्या पॅलेस्टाइन व इस्रायलला भेट देणार असून त्यानंतर बहारिन येथे होणाºया भारत-अरब लीगच्या परराष्ट्रमंत्री बैठकीस त्या उपस्थित राहतील. या भेटीमध्ये सुषमा स्वराज इस्रायलचे राष्ट्रपती रियुवेन रिवलिन, पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू, संरक्षणमंत्री मोशे यालोन, राष्ट्रीय पायाभूत सुविधा मंत्री युवाल स्टेनिट्झ यांची भेट घेतील. त्याचप्रमाणे त्या भारतीय ज्यू समुदायाचीही भेट घेतील.
भारत-इस्रायल यांच्या संबंधांवर दृष्टीक्षेप...
१९९२ - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
१९९७- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
२०००- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
२००३- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
२००६- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची इस्रायल भेट
२०१२- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
२०१४- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट.
२०१४- टष्ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
२०१४- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
२०१५- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
२०१५- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती.
व्यापारी संबंध...
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.