जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने भारताकडे खोदल्या जात असलेल्या तब्बल १४ फूट लांबीच्या बोगद्याचा पर्दाफाश झाला आहे. अर्निया सेक्टरमध्ये पाकने युद्धाची तयारी सुरू केल्याचा हा एक पुरावा मानला जात आहे, असे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) म्हटले आहे.दमानाजवळ विक्रम व पटेल चौक्यांदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमेवर सतर्क जवानांनी या बोगद्याचा छडा लावला. यावरून या भागात सशस्त्र घुसखोर आहेत व ते परत पलायन करण्याच्या तयारीत आहेत, असे समजले जात आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा भारताने समोर आणला आहे व तो देश दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, ही बाब जगासमोर आली आहे. बीएसएफने या बोगद्याचा पर्दाफाश करून फार मोठी कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएफला पूर्णपणे मोकळीक दिली, त्यामुळे बीएसएफ चांगली कामगिरी करीत आहे.२०१२ मध्ये जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी ४०० मीटर लांबीच्या बोगद्याचा पर्दाफाश केला होता. विशेष म्हणजे त्यात हवा खेळती राहण्यासाठी पाईपही लावण्यात आले होते. २००९ मध्ये अखनूर सेक्टरमध्येही अशाच बोगद्याचा पर्दाफाश करण्यात आला होता.
भारत-पाक सीमा : १४ फूट लांबीच्या बोगद्याचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:57 AM