ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा दिल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला. भारताच्या या इशा-यानंतर पाकिस्तान बिथरलेला दिसतो आहे. कारण, भारत आणि पाकिस्तान नेहमी एकमेकांचे शत्रू बनून राहू शकत नाहीत आणि दोन्ही शेजारी देशांनी संवाद साधण्यासहीत वादांवर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असे मत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जंजुआ यांनी मांडले आहे.
पाकिस्ताननं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवरच जंजुआ यांनी हे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे, भारत द्विपक्षीय संबंधांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी नकार देत असल्याचा आरोपही जंजुआ यांनी केला आहे. दरम्यान, जाधव यांनी फाशी शिक्षा झाल्यास याचे द्विपक्षीय संबंधांवर वाईट परिणाम होतील, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.
कॅनडातील उच्चायुक्त पेरी सेल्डवुड यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या संवादादरम्यान जंजुआ यांना सांगितले की, "भारत काश्मीरला एक द्विपक्षीय समस्या समजत आहे आणि दुसरीकडे याच नियमांचे उल्लंघन करुन काश्मीर मुद्यावर चर्चाही करत नाही", असा कांगावा त्यांनी केला.
काश्मीरमधील परिस्थितीचा यावेळी उल्लेख करत ते असेही म्हणाले की, "कट्टरपंथीयांचे विचार केवळ शक्तीचा वापर करुन बदलले जाऊ शकत नाहीत, तर त्यासाठी त्यांचे हृदय जिंकावे लागेल. यासाठी दोन्ही देशांना संवाद साधायला हवा".
मात्र, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर पाऊलं उचलत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानातील सरकारी असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी)नं जंजुआ यांच्या वक्तव्याचा हवाला देत सांगितले की, दोन्ही देशांना संवाद आणि वादावर उपाय शोधून काढणे गरजेचं आहे. भारत-पाकिस्तान नेहमीच एकमेकांचे शत्रूराष्ट्र बनून राहू शकत नाहीत. शिवाय यावेळी एनएसजी गटात पाकिस्तानच्या सदस्यत्वाचा विचारासाठी भेदभाव न करण्याचा आग्रहही त्यांनी केला.