ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होऊ शकते . एप्रिल महिन्यात इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सी (PMSA)च्या बैठकीसाठी भारताने तयारी दर्शवल्याचं वृत्त आहे. 15 एप्रिलच्या आसपास ही बैठक भारतात होऊ शकते.
यापुर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये दोन्ही देशांमध्ये बैठक झाली होती. उरी हल्ल्यानंतर मोठ्या स्थरावर दोन्ही देशांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ असेल. 2005 मध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि पाकिस्तान मरीटाइम सिक्युरिटी एजन्सीमध्ये एक करार झाला होता. यानुसार दोन्ही देश बेकायदेशीर जहाजे, महासागर प्रदूषण आणि नैसर्गिक संकटाबाबत माहिती देतील असं ठरलं होतं. 2016 मध्ये हा करार 5 वर्षांनी वाढवण्यात आला होता.
याशिवाय जून महिन्यात शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं होतं.