वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी बेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी 7 संमेलनात भेट झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली. आम्ही पाकिस्तानशी या मुद्द्यावर चर्चा करू आणि तोडगा काढू असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं तर दुसरीकडे मोदींनीही त्यांच्यासमोरच पाकला ठणकावलं होतं. पाकिस्तानबरोबर जे मुद्दे आहेत ते द्विपक्षीय आहेत. भारत-पाक द्विपक्षीय संबंधांतून काश्मीर मुद्दा सोडवू, हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाला त्रास देणार नाही. आम्ही चर्चेच्या माध्यमातून या मुद्द्यावर तोडगा काढू, असं आश्वासनही मोदींनी ट्रम्प यांना दिलं होतं.
'काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु दोन आठवड्यांपूर्वी जेवढा तणाव या दोन्ही देशांमध्ये होता तो आता कमी झाला आहे' असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सोमवारी (9 सप्टेंबर) ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी 'दोन्ही देशांची साथ हवी आहे. जर दोन्ही देशांची इच्छा असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. याआधीही भारत पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जुलै महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भारताने हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. तसेच भारत-पाक द्विपक्षीय संबंधांतून काश्मीर मुद्दा सोडवू, हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाला त्रास देणार नाही. आम्ही चर्चेच्या माध्यमातून या मुद्द्यावर तोडगा काढू असंही मोदींनी सांगितलं होतं.