नवी दिल्ली : ‘तुमची भारतभेट ही भारताप्रती आणि उभय देशांमध्ये वर्षानुवर्षे असलेल्या मैत्रीच्या अतूट बंधनाप्रति तुम्हाला असलेली आस्था यांचे प्रतिबिंब आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे स्वागत केले. उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ करणारे २८ विविध करार यावेळी झाले.
व्लादिमिर पुतिन यांचे सोमवारी भारत दौऱ्यावर आगमन झाले. मोदी-पुतिन यांच्यात येथील हैदराबाद हाउसमध्ये चर्चा झाली. तत्पूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोग्यु यांच्याशी तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे समपदस्थ असलेले सर्गेई लॅवरोव्ह यांच्याशी चर्चा केली. उभय देशांत सहा लाख एके-२०३ ॲसॉल्ट रायफलींच्या उत्पादनासंदर्भात करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मोदी व पुतिन यांच्यात अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाऊ नये, यावर एकमत झाले. पुतिन यांनी भारत हा जुना आणि विश्वासू मित्र असल्याचे नमूद केले.