नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8,954 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 267 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये कोरोना मृतांच्या आकड्य़ाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये 1339 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे पण सानुग्रह अनुदानासाठी तब्बल 10 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.
इंदूर शहरातील सरकारी रेकॉर्डमध्ये कोरोना महामारीमुळे 1339 मृत्यूची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांकडून 10 हजारांहून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत. यामध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीबाबत विविध योजना आणि सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. हे अर्ज प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, मुख्यमंत्री कोविड योद्धा योजना, तसेच भारत सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या 50 हजार रुपयांच्या सानुग्रह रकमेशी संबंधित आहेत. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना या योजनांतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
इंदूरमध्ये 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान
महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि मदत आयुक्त मनीष रस्तोगी यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये इंदूर जिल्ह्यात 200 हून अधिक मृतांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. या योजनेसाठी दररोज शेकडो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी तीन हजारांहून अधिक अर्ज आले होते. मात्र, त्यातील किती बरोबर आणि किती अयोग्य हे तपासानंतरच कळेल. या अर्जांची छाननी करणेही प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
एकाच कुटुंबातून दोन अर्ज येण्याची शंका
मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता एकाच कुटुंबाकडून मदतीच्या रकमेसाठी दोन अर्जही आले असावेत, अशी शंका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापैकी काही अर्ज असेही असू शकतात की, वडिलांच्या मृत्यूनंतर दोन किंवा तीन मुलांनी वारस म्हणून अर्ज केले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनीही सानुग्रह अनुदानासाठी दावा केला असावा. आता तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.