Indore Accident :मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात असलेल्या विहिरीचे छत अचानक कोसळले. यावेळी त्या छतावर उभे असलेले 25-30 लोक विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात एक विहीर आहे, ज्यावर छत टाकण्यात आले होते. राम नवमीमुळे मंदिरात भाविकांची गर्दी होती. यावेळी अनेकजण या विहिरीच्या छतावर उभे होते. यावेळी अचानक हे छत कोसळले आणि त्यावर उभे असलेले लोक विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलींचाही समावेश आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले, तसेच प्रशासनाचे बचाव पथकही दाखल झाले.
राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी ट्विट करुन या घटनेवर दुःख व्यक्त केले. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील.