उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्याचे दररोज विविध फोटो समोर येत आहेत. यावेळी अनेक साधू आणि बाबा खूप प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'बवंडर बाबा', जे मध्य प्रदेशातील इंदूर येथून आले आहेत.
बुलेटवर स्वार झालेले आणि काळा गॉगल घातलेले बवंडर बाबा गेल्या ४७ महिन्यांपासून देशभर फिरत आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याचा एकच उद्देश आहे; तो म्हणजे हिंदूंना हे समजावून सांगणं की, त्यांच्याकडून देव-देवतांच्या फोटोंचा आणि मूर्तींचा अपमान होऊ देऊ नये.
आयएएनएसशी बोलताना बवंडर बाबा म्हणाले, "हर हर महादेव! आम्ही बवंडर बाबा... मध्य प्रदेशातील इंदूरहून आलो आहोत. आम्ही ४७ महिन्यांपासून संपूर्ण भारतभर प्रवास करत आहोत. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी इंदूर येथून हा प्रवास सुरू झाला. आपल्या यात्रेचा मुख्य मुद्दा म्हणजे हिंदूंकडून हिंदू देव-देवतांच्या मूर्तींचा अपमान का केला जातो?"
"लोक लग्नाच्या कार्डवर देवदेवतांचे फोटो छापतात. कापूर, अगरबत्ती आणि फटाक्यांवरही देवांचे फोटो असतात, जे नंतर फेकून दिले जातात. आता २०२५ आहे. एका वर्षासाठी, हिंदू घरातील लोक देवाचा फोटो असलेल्या कॅलेंडरसमोर हात जोडून प्रार्थना करत होते. एका वर्षानंतर, ते कॅलेंडर रद्दी विक्रेत्यांना देण्यात आलं."
"रद्दी विक्रेत्यांनी ते अंडी विक्रेत्याला दिलं. हिंदू लोक देवाच्या मूर्ती मोठ्या आदराने त्यांच्या घरी आणतात. परंतु, काही काळानंतर ते रस्त्यावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून अपमान केला जातो. आमचा प्रयत्न देशभरातील हिंदूंकडून होणारा देव-देवतांच्या फोटोंचा अपमान थांबवण्याचा आहे."